भारत जसा आहे तसा त्यावर प्रेम करा. भारतातल्या गरीब, दुखी-पिडीतांवर प्रेम करा. प्रत्येक जीव ईश्वराचेच रूप आहे त्यामुळे माणसातल्या ईश्वराची पूजा करणे सर्वश्रेष्ठ पूजा आहे, असा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. तो विचार आज कृतीत आणण्याची गरज आहे असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बी. निवेदिता यांनी केले. येथील मुंबई विद्यापीठ, राम नारायण रुईया महाविद्यालय आणि जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाच्या विविध पैलूंवर दोन दिवशीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या समारोपप्रसंगी निवेदिता बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. शुभदा जोशी, जोशी बेडेकर महाविद्यालाच्या प्राचार्य डॉ. शकुंतला सिंग, डॉ. वत्सला पै आदी मान्यवर उपस्थित होते.
विख्यात अर्थतज्ञ आणि विचारवंत एस. गुरुमुर्ती यांच्या मार्गदर्शनाने राम नारायण रुईया महाविद्यालयात परिसंवादाला प्रारंभ झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. भारताच्या अंगभूत सामर्थ्याची उदाहरणे देत गुरुमूर्ती यांनी स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचे अनेक पैलू उलगडून दाखविले. स्वामीजींनी भारतीयांना त्यांची हरवलेली ओळख पुन्हा मिळवून दिल्याचे सांगून गुरुमूर्ती म्हणाले की विवेकानंदांनी आपल्याला महानतेशी जोडले. भारताला जगद्गुरू बनण्यासाठीचे दिशादर्शन केले.
स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानावरील परिसंवादाला विद्यापीठातील तरुण- तरुणींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. युवा प्राध्यापकांनी परिसंवादात अनेक संशोधनपर प्रबंधांचे वाचन केले. विश्वधर्माची संकल्पना, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून विवेकानंदांचे विचार, अध्यात्म आणि विज्ञान, वेदांताचे विविध पैलू, वैश्विक दृष्टी आणि उच्च जीवनमूल्ये, व्यवस्थापन : स्वताचे आणि समाजाचे या विषयांवरील परिसंवादात संशोधक - अभ्यासकांनी आपले प्रबंध वाचले आणि त्यावर चर्चा झाली. प्रबंध सादर केलेल्यांमध्ये डॉ. त्रेवोर अल्लीस, डॉ. तबस्सुम शेख, डॉ. अमिता वाल्मिकी, डॉ. राधाकृष्ण पिल्लई, डॉ. वत्सला पै, प्रा. पूर्णिमा दबे, डॉ. गीता रमणा, प्रा. हर्ष बाडकर, प्रा. सिम्मीन राय, डॉ. शोभा दोशी, डॉ. अर्चना मलिक, प्रा. कमला श्रीनिवास, डॉ. मीनल कातार्निकर, डॉ. शर्मिला वीरकर, डॉ. प्रिया वैद्य, राजेश कामत, रणजीत शेट्टी, डॉ. गीता मोहन यांचा समावेश होता. या चर्चासत्रात अध्यक्ष आणि चर्चा प्रवर्तक म्हणून डॉ. राजेश अरोरा, डॉ. शुभदा जोशी, डॉ. शकुंतला सिंग, डॉ. रमेश दबे, प्रीती मल्होत्रा, प्रा. सुचित्रा नाईक, डॉ. ललिता नामजोशी, अनुपमा मुजुमदार, डॉ. कांचन महादेवन, डॉ. उमा शंकर, प्रा. शेहेर्नाझ नाल्वाल्ला आदी मान्यवरांचा सहभाग राहिला.
स्वामी विवेकानंद आणि स्वामी दयानंद स्वरस्वती यांचे गाढे अभ्यासक व दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. सतीश कपूर तसेच प्रकाश पाठक ( संस्कार भारतीचे प्रांत अध्यक्ष ), डॉ. राजपाल हंडे यांची विशेष व्याख्याने झाली.
साभार: सिद्धाराम पाटील, दिव्य मराठी